समाजात जन्मणाऱ्या बालकांच्या सदृढतेसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा दिशादर्शक उपक्रम -मिनल पारख
कुपोषितमुक्त बालकांसाठी महिलांच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत आरोग्यसेवेचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या पाठिशी प.पू. आनंदऋषीजींचे कृपा आशिर्वाद असल्याने रुग्ण बरे होऊन घरी जातात. मोठ्या श्रद्धेने आलेल्या रुग्णांना दवा आणि दुवा एकत्र मिळते. समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी, जन्मणाऱ्या बालकांच्या सदृढतेसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी दिली जाणारी आरोग्यसेवेचा उपक्रम दिशादर्शक आहे. समाजात कुपोषणमुक्त बालकांसाठीहॉस्पिटलने महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन उद्योजिका मिनल पारख यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सौ. इंदुमती अशोक पारख व पारख परिवाराच्या वतीने आयोजित मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पारख बोलत होत्या. यावेळीअभय पारख, अतुल पारख, बीडचे अशोक लोढा, जवाहरलाल बोरा, उज्वल कोटेचा, बाळूशेठ संचेती, किशोर नहार, संतोष बोथरा, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, स्त्री रोग तज्ञ डॉ. सोनल बोरुडे, डॉ. हिरल चौधरी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात अशोक पारख व पारख परिवाराचे नेहमीच हातभार लागत असते. सर्वांच्या योगदान, सदिच्छा व सहयोगाने ही आरोग्य सेवा सुरू आहे. बीड मध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेंटरद्वारे मोठ्या प्रमाणात डायलेसिसची सेवा सुरु आहे. बीड येथील सेंटर अशोक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. ते सामाजिक व राजकीय नेतृत्व करत असताना एका कार्यकर्ता म्हणून आरोग्यसेवेशी जोडले गेलेले आहे. बीड हा मागासलेला भाग असून, येथे 16 लाख ऊस तोडणी कामगार आहे. या भागातील गरज ओळखून हे सेवा कार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच आनंदऋषीजीमध्ये सर्वसामान्य घटकातील महिलांच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत त्यांच्या विविध तपासण्या व पोषण आहार देण्यापर्यंत सेवाकार्य सुरु आहे. कुपोषित बालक जन्माला येऊ नये, या उद्देशाने ही विशेष मोहिम चालवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक लोढा म्हणाले की, प्रत्येकाने योगदान देऊन समाजाचे दायित्व निभावले पाहिजे. आनंदऋषीजी हॉस्पिटलशी जोडलेले गेलेला प्रत्येक सदस्य व डॉक्टर आरोग्यसेवेचे व्रत सांभाळत आहे. प्रत्येक रुग्णाच्या हृदयातून चांगली आरोग्य सेवा मिळाल्याची भावना व्यक्त होते. बीड मधील सेंटरद्वारे सोनोग्राफी, अँजिओग्राफी, डायलिसिस, नेत्र तपासणी आदी सुविधा दिल्या जात आहे. नगरच्या धर्तीवर बीडमध्ये भव्य हॉस्पिटल उभे राहणार असून, याद्वारे गोर-गरीबांची आरोग्यसेवा घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. हिरल चौधरी म्हणाल्या की, गरोदर स्त्रीयांचे आरोग्य जपताना जन्माला येणारे बालक सदृढ असण्यासाठी महिलांचा आहार व आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. कुपोषित बालक होऊ नये, यासाठी हॉस्पिटलची मोहिम सुरु आहे. हॉस्पिटलमध्ये महिलांच्या विविध आरोग्य समस्या व गरोदर महिलांसाठी विविध तपासण्या, प्रसुती व प्रसुतीनंतरचे उपचार देखील अल्पदरात केले जात आहे. एखाद्या महिलेस मुले होत नसेल आणि गर्भधारणा ठरत नसेल तर याबाबत देखील मार्गदर्शन करुन उपचार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शिबिरात स्त्री रोग तज्ञ डॉ. सोनल बोरुडे व डॉ. हिरल चौधरी यांनी 215 महिलांची आरोग्य तपासणी केली. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
