छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेचा उपक्रम
125 ग्रामस्थांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना नवदृष्टी देण्याच्या उद्देशाने स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि वैष्णवी ऑप्टीकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी लक्ष्मण चौरे, रामदास पवार, नवनाथ हारदे, डॉ. वैष्णवी जरबंडी, डॉ. आकाश जरबंडी, डॉ. ओमकेश कोंडा, नवनाथ कृपा महिला ग्रामसंघ (सीआरपी) सोनाली फलके, मंगल ठाणगे, अनिल आनंदकर, रामचंद्र फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, नवनाथ हारदे, जयवंत जाधव आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सध्या आरोग्य सेवा महाग झालेली असताना सामान्य जनतेला तिचा लाभ घेणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठ ग्रामस्थांना डोळ्यांच्या समस्या अधिक भेडसावतात. अशा शिबिरातून गरजूंना आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी सेवाभावाने ग्रामीण भागात आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामधील दृष्टीदोष असलेल्या अनेक नागरिकांवर अल्पदरात विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
गावातील श्री संत सावता महाराज मंदिराच्या सभामंडपात शिबिर पार पडले. या शिबिरात अद्ययावत संगणकीय उपकरणांद्वारे 125 ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू नागरिकांना अल्प दरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू व काचबिंदूसारख्या डोळ्यांच्या आजारांसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
