• Tue. Jan 27th, 2026

विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या निशुल्क मोहटा देवी दर्शन यात्रेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Oct 20, 2023

हजारो महिलांनी घेतला उपक्रमाचा लाभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सुरु असलेल्या श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन उपक्रमाला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना मोफत मोहटा देवीचे दर्शन घडविण्यात येत आहे.


टीव्ही सेंटर येथून प्रतिष्ठानच्या वतीने मोफत बसची सेवा सुरू आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सुरु झालेल्या या उपक्रमातून हजारो महिलांनी मोहटा देवीचे दर्शन घेतले. दररोज देवीच्या दर्शनासाठी महिला भाविकांच्या बसची रवानगी केली जात आहे. महिला भाविकांना उपवासाचे फराळ, नाश्‍ता, पाणी बॉटल, फळे आदींची सोय प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर महिलांना चांगल्या पद्धतीने मोहटा देवीचे दर्शन घडत आहे.


या दर्शन यात्रेसाठी सावेडी उपनगर भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून, सर्व सोयीयुक्त देवीची मोफत दर्शन यात्रा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार निलेश लंके यांच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवला जात असून, ही सेवा दरवर्षी नवरात्र उत्सवात सुरु राहणार असल्याची भावना योगेश सोनवणे पाटील यांनी व्यक्त केली.
महिला वर्गाला देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे. महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना आपल्या मैत्रीणींसह घराबाहेर पडता येत नाही. मात्र या सहलीतून मैत्रिणीबरोबर देवदर्शनाचा आनंद लुटता येत असल्याची भावना महिला भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *