बाराबाभळी मदरसेच्या व्याख्यानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुरान हाफिज झालेल्या 27 युवकांचा झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याची पिढी सुधारली नाही, तर भावी पिढी चांगली घडणार नाही. भावी पिढीचे भवितव्य धोक्यात असताना युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. सध्याचे युवक मोहमायेच्या जगात अडकले असून, खऱ्या जीवनाची कल्पना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रेरक वक्ते मुनव्वर जमा यांनी केले. तर शिक्षणाने प्रगती साधता येणार असल्याचा संदेश देऊन धार्मिक शिकवणीचे मुल्य सांभाळून यशस्वी जीवनाचा मार्ग त्यांनी उलगडला.

बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात मुस्लिम समाजातील युवकांसाठी शैक्षणिक जागरुकतेवर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना मुनव्वर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामिया इस्लामीया इशत उल उलुम अक्कलकुआ या संस्थेचे सीइओ मौलाना हुजैफा वस्तानवी, हाजी इरफान शेख, हाजी शौकत तांबोली, हाजी उस्मान, हाजी एजाज तांबोली, चेअरमन आसिफ शेख, सचिव मतीन सय्यद, हाजी इब्राहिम शेख, अमीर सय्यद, हाजी जमीर, हाजी नसीर, अतिक तांबोली, मदरसेचे प्रमुख (कारी) मोहंमद शादाब, आयटीआयचे प्राचार्य नदिम शेख, मौलाना शफीक कासमी, अब्दुल खोकर, हमीद पटवेकर आदींसह मदरसाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे मुनव्वर म्हणाले की, मनुष्य म्हणून जगताना लोकांना आपल्याकडून प्रेरणा मिळावी असे जीवन जगावे. यशस्वी जीवनासाठी मोहम्मद पैगंबरांची शिकवण अंगीकारावी. सर्व विद्यार्थ्यांमधून पाच टक्केच विद्यार्थी चमकतात व पुढे जातात. बाकीचे देखील पुढे जाण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यशस्वी होताना मदत करणारे बना, समाजाला बरोबर घेऊन चालण्याचे त्यांनी आवाहन केले.

मौलाना हुजैफा वस्तानवी यांनी सध्याचे जीवन व मृत्यूनंतरचे जीवन यावर भाष्य करुन जीवनाच्या ध्येयाचा उलगडा केला. अल्लाहासाठी जीवन व्यतीत करुन केलेल्या पापाचे प्रायश्चित करण्याचे स्पष्ट करुन युवकांना सत्याचा मार्ग दाखविणारे धार्मिक प्रवचन त्यांनी केले.

या कार्यक्रमात मदरसामधील कुरान हाफिज झालेल्या 27 युवकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी मुस्लिम युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गच्च भरलेल्या सभागृहात प्रेरक वक्त्यांच्या भाषणांनी युवक प्रफुल्लीत झाले. पाहुण्यांचे स्वागत आयटीआयचे प्राचार्य नदिम शेख यांनी केले. आभार मदरसेचे प्रमुख (कारी) मोहंमद शादाब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदरसा व आयटीआय विभागाच्या शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.