प्रबोधिनी पठाडे व दुर्गा कवडे ठरल्या प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

संस्कारक्षम युवक घडविण्यासह पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत प्रथम- प्रबोधिनी पठाडे, द्वितीय- स्वरा परभणे, तृतीय- दुर्गा कवडे, उत्तेजनार्थ- प्रज्वल थोरवे तसेच पोस्टर स्पर्धेत प्रथम- दुर्गा कवडे, द्वितीय- समृध्दी सुर्वे, तृतीय- साईराज नागरे, उत्तेजनार्थ- प्रबोधिनी पठाडे यांनी या विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकाविली.
निबंध स्पर्धेसाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज, युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंदाची धर्मनिष्ठा व राष्ट्र प्रेम, आदर्शमाता राजमाता जिजाऊ व आजची महिला हे विषय देण्यात आले होते. या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेखन केले. तर व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेत व्यसनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी चित्रात दर्शविले. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. रंगनाथ सुंबे व पोस्टर स्पर्धेचे परीक्षण देवीदास बुधवंत यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे यांनी शुभेच्छा दिल्या. या विजेत्या स्पर्धकांना 14 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.