खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वत: केली पत्रकारांची आरोग्य तपासणी
आमदार जगतापांनी केले उपक्रमाचे कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3 डिसेंबर) झालेल्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावून स्वत: पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. तर सुपरफास्ट बातम्यांच्या युगात पत्रकारांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करुन, पत्रकारांसाठी राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक केले.
अहमदनगर शहरात मराठी पत्रकार परिषदेतर्फे वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, डॉ. इमरान शेख आदींसह पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराला आमदार संग्राम जगताप यांनी देखील भेट देऊन पत्रकारांच्या आरोग्यासाठी घेण्यात आलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे स्वागत परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी केले. प्रास्ताविकात परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी मराठी पत्रकार परिषदेची भूमिका स्पष्ट करुन पत्रकारांसाठी परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. तर दरवर्षी परिषदेचा वर्धापन दिवस पत्रकारांच्या आरोग्य तपासणीने होत असल्याचे सांगून, यावर्षी एकाच वेळी राज्यातील 10 हजार पत्रकारांची तपासणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बापूसाहेब नागरगोजे म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. कोरोना काळात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निराशमय बनलेल्या जीवनात पत्रकारांनी समाजाचे मनोधैर्य उंचावण्याचे कार्य केले. तर घराघरापर्यंत जागृती केली. पत्रकारांनी कामाच्या व्यस्त दिनचर्येत स्वतःचे आरोग्य सांभाळावे. घेण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून, बदलती जीवनशैली व धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, पत्रकार व पोलीस समाजातील एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही घटक समाजाचा आजार ओळखून त्यावर उपचार करत असतात. या क्षेत्रात सर्वसामान्यांची मुले येतात. पत्रकार हा समाज मन भरकटलेल्यांना व्यसन घालून रुळावर आणण्याचे काम करतो. पत्रकार एकत्र आले तर मोठी ताकद उभी राहते, असे त्यांनी सांगितले.
हरजितसिंह वधवा यांनी नगरची पत्रकारिता सामाजिक सलोखा राखणारी असून, बंधुभाव वाढवणारी आहे. कोरोना काळात देखील पत्रकारांनी सकारात्मक लेखणीतील ऊर्जा निर्माण केल्याचे सांगितले. विठ्ठल लांडगे यांनी कोरोना काळात अनेक ज्येष्ठ पत्रकार गमावल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. पत्रकारांनी स्वतःची व एकमेकांची काळजी घेऊन वाटचाल करावी. पत्रकार म्हणून एकत्र आल्यास प्रवास सुखकर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. इमरान शेख म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरोग्य सांभाळणारा घटक आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगून, त्यांनी शहरातील पत्रकारांसाठी युनायटेड सिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रुप इन्शुरन्स करून देण्याचे आश्वासन दिले.
या शिबिरात पत्रकारांची मधुमेह, उच्च रक्तदाब व नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. विशाल कदम यांनी आरोग्य तपासणी केली. तर डॉ. अरबाज शेख यांनी नेत्र तपासणी केली. पत्रकारांना यावेळी मोफत नंबरचे चष्मे व गॉगलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध तिडके यांनी केले. डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. प्रारंभी नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुधीर लंके, सदस्यपदी निवड झालेले विजयसिंह होलम व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी निवड झालेले पत्रकार बंडू पवार यांचा सत्कार करण्यात आला.