• Tue. Nov 4th, 2025

रक्तदान शिबिराला देवी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Oct 7, 2024

श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचा उपक्रम

सामाजिक जाणीव ठेऊन युवकांनी रक्तदान करावे -प्रभाकर भोर

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास युवकांसह देवी भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर भाविकांसाठी सात दिवस विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरु असून, याचा लाभ भाविक घेत आहे.


शिबिराचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.


प्रभाकर भोर म्हणाले की, रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे. सामाजिक जाणीव ठेऊन युवकांनी रक्तदान करण्याची गरज आहे. काही दुर्घटना घडल्यास रक्तदाता हा त्या गरजू व्यक्तीचा जीवदाता ठरतो. श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून शारदीय नवरात्रोत्सव सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून भाविकांना संधी उपलब्ध करुन दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंदिरा समोरील मैदानात झालेल्या रक्तदान शिबिरासाठी साईसेवा ब्लड सेंटर अहमदनगर सहकार्य लाभले. प्रारंभी रेणुकामातेची आरती करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *