दहाव्या वर्षी कोट्यवधींची उलाढाल; राज्यभरातील महिला उद्योजकांचा सहभाग
खाद्यपदार्थ, हस्तकला व सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी; पारंपरिक ते आधुनिक पदार्थांचा नागरिकांनी घेतला आस्वाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, तसेच महिला उद्योजकतेला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष होते.
चार दिवस चाललेल्या या महोत्सवात महिला बचत गटांच्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ व अन्नधान्याच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
या महोत्सवात अकोले-राजूर येथील हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी, काळभात, पेढे, गावरान कडधान्य, सोनमाळ, राहुरीचे गावरान तूप, विविध प्रकारचे मसाले, जळगावचे तांब्याचे दिवे, ज्वारी व नाचणी पापड, जामखेडची लाकडी पोळपाट-लाटणे, आवळ्याचे पदार्थ, मेहंदी, मॅग्नेटिक थेरपी, आयुर्वेदिक उत्पादने, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन, सेंद्रिय गुळाचा बासुंदी चहा, कॉफी-लेमन टी, रांगोळ्या, हस्तनिर्मित दागिने, वुलन प्रॉडक्ट्स, स्किन केअर, खाकर, चटण्या, मुखवास, सर्व प्रकारचे पापड, उन्हाळी पदार्थ, खेळणी, पर्स, वनौषधी, पूजा साहित्य, साड्या, रेडिमेड ब्लाऊज, हर्बल कॉस्मेटिक्स, लहान मुलांचे कपडे, गुळ पावडर, माठातले लोणचे यांसह विविध प्रकारच्या वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व उत्पादनांना ग्राहकांची विशेष मागणी होती.
यंदाच्या महोत्सवात मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, हिंगोली, नांदेड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला बचत गट व महिला लघुउद्योगांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. यामुळे महोत्सवाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले होते. महोत्सवातील खाऊ गल्ली हे नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. येथे सोयाबीन चिल्ली, कच्ची दाबेली, साबुदाणा वडे, हुलग्याचे शेंगोळे, पनीर चिल्ली, विविध प्रकारचे केक, हुरडा, मुगाचे भजे, राजस्थानी डाल बाटी, उकडीचे मोदक, पाणीपुरी, आईस्क्रीम, बदामशेक, थालपीठ, सोलापुरी शेंगदाणा चटणी आदी चविष्ट पदार्थांचा नागरिकांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महोत्सवाचे मुख्य संयोजक व जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांच्यासह जयश्री शिंदे, रजनी ताठे, ॲड. आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, ॲड. दिनेश शिंदे, अनंत द्रवीड, अनिल साळवे, सचिन साळवी, ॲड. अक्षय ठोकळ, ॲड. गायत्री गुंड, ॲड. तुषार शेंडगे, जयेश शिंदे, इसाभाई शेख, मेजर भिमराव उल्हारे, प्रा. सुनील मतकर, हेमलाता कांबळे, दिपाली उदमले, स्वाती डोमकावळे, अश्विनी वाघ, ॲड. विद्या शिंदे, ॲड. मनीषा भिंगारदिवे, बाळासाहेब पाटोळे, तुषार रणनवरे, मीनाताई म्हसे, निलेश रासकर, संतोष उल्हारे, कान्हू सुंबे, रमेश गाडगे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, राजकुमार चिंतामणी, प्रा. हर्षल आगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
