शासकीय कर्ज योजना, उद्योजकता विकास,आर्थिक नियोजन व विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कोपरगाव येथे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) मधील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी एक दिवसीय मोफत उद्योजकीय कार्यशाळा पार पडली.
कोपरगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या कार्यशाळेला युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (एम.एस.एस.आय.डी.सी.) व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (डी.आय.सी.सी.आय) च्या वतीने तर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी व एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्सिट्यूटच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली.
शार्प बिजनेस कन्सल्टन्सी संचालक रविराज भालेराव यांनी प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना उद्योगासाठी शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली. तर उद्योजकता विकास, आर्थिक नियोजन, विक्री व्यवस्थापन, उद्योजक क्षेत्रातील संधी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात जवळपास 50 जणांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कल्याणी वारकर, निकिता माकोडे, वैष्णवी वारकर, काजल माकोडे, सुचित्रा टुपके, साक्षी माकोडे, सचिन त्रिभुवन, मंगेश उदबत्ते, हर्षय शिरसाठ, युवराज खेडकर आदींनी परिश्रम घेतले..