• Tue. Nov 4th, 2025

कल्याण रोडच्या सीनेच्या पूलावरील कामाला गती द्या

ByMirror

Oct 11, 2024

पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिवे बसविण्याची मागणी

युवा सेनेचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंत्याला निवेदन

नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या कल्याण रोडच्या सीना नदीच्या पूलावरील पर्यायी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन पथदिवे बसविण्याची व पुलाचे काम जलदगतीने करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. अन्यथा नगर-कल्याण रोड परिसरातील नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांच्याशी सदर प्रश्‍नी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे, सचिन ठाणगे, मयुर थोरात, कृष्णा पाचबैल, विनीत झरकर आदी उपस्थित होते.


सीना नदीवरील पुलाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता अतिशय खराब झाला असून, त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सदरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्त्यावर रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही व अपघात होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


नगर-कल्याण महामार्गावर बायपास पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. याच रस्त्यावरून अनेक गावातील ग्रामस्थ शहरात येत असतात. या रस्त्यावरुन अनेक अवजड वाहने शहरात येतात. अनेक शाळकरी विद्यार्थी, कामगार व महिला वर्ग या रस्त्यावरून जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करत असतात. रस्त्यावर असलेले खड्डे व सीना नदीच्या पुलाच्या पर्यायी रस्त्यावर असलेला अंधार वाहतुकीस फार मोठी अडचण ठरत आहे. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असून, सदर रस्त्यावर पूर्वी अपघात होऊन अनेकांचा जीव गेलेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सीना नदीच्या पुलाचे काम सुरु असताना बनवलेला पर्यायी रस्याची अतिशय दुरावस्था झाली असून, तो फारच अरुंद असल्याने वारंवार वाहतुक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सीना नदीवरील पुलाचे काम जलद गतीने होण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *