• Fri. Sep 19th, 2025

सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश

ByMirror

Sep 18, 2025

पावसाळ्यातही करता येणार अंत्यविधी

अखेर नागरदेवळे स्मशानभूमीचे रुप पालटले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्थेचे अखेर रुप पालटले. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेकडून स्मशानभूमीसाठी निधी प्राप्त होवून त्याचे काम मार्गी लागले असून, ग्रामस्थांना व्यवस्थितपणे अंत्यविधी करता येणार आहे.


नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था निर्माण झाल्याने अंत्यविधी करण्यास गंभीर अडचणी निर्माण होत होत्या. पावसाळ्यात अंतयात्रा सभा मंडपात थांबवून पाऊस थांबल्यानंतर अंत्यविधी केले जात होते. या प्रश्‍नाकडे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी आवाज उठवून जिल्हा परिषदकडे निधीची मागणी केली होती.


सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपाभियंता यांनी तातडीची गरज ओळखून तांत्रिक मंजूरी व निधी उपलब्ध करुन दिला. जिल्हा परिषद प्रशासनाने 14 लाख रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर काढून कार्यरंभाचे आदेश दिले होते. तरी देखील ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे एक महिना उलटूनही काम सुरु न झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.


यानंतर खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून स्मशानभूमीत पत्र्याचे शेड नव्याने बसवून पेव्हिंग ब्लॉक, प्रवेशद्वार व पथदिव्यांचे काम करण्यात आले आहे. तसेच बसण्यासाठी ओट्यांची व्यवस्था व पाण्याच्या टाकीचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती जालिंदर बोरुडे यांनी दिली.


गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित होता. शेडसह स्मशानभूमीत बसण्याची व्यवस्था, रात्री प्रकाश नसल्याने आणखी अडचणी निर्माण होत होत्या. अशा दुःखद प्रसंगी आवश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. स्मशानभूमीचा प्रश्‍न सुटल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *