श्री समर्थ दर्शन” लहान-थोरांसाठी प्रेरणादायी -श्री अजेयबुवा रामदासी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ”श्री समर्थ दर्शन हा राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित विविध ठळक घटनांच्या चित्रमाहितीचे प्रदर्शन कौतुक करण्यासारखेच आहे.खरंतर शिक्षण क्षेत्रातूनच मूल्यांची पायाभरणी सध्याच्या आधुनिक भारतामध्ये होत आहे. बोललेल्या शब्दांपेक्षा छापलेली चित्र आणि अक्षरे मनावर अधिराज्य करतात. त्यामुळे हे साहित्य शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत जावे.”असे प्रतिपादन निरूपणकार- कथाकार श्री अजेयबुवा रामदासी महाराज यांनी केले.
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस् यांच्या माध्यमातून सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात सुमारे 15 स्टँडीच्या माध्यमातून प्रस्तुत केलेल्या श्री समर्थ दर्शन या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री रामदासी महाराज बोलत होते.श्री संजय कुलकर्णी (सोहळा समिती प्रमुख) व समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी समर्थांच्या जीवन चरित्रावर आधारित या उपक्रमात परिचय,श्री समर्थ लिखित गणपतीची आरती, श्री समर्थांचा शिष्य परिवार,श्री समर्थ स्थापित अकरा मारुती, श्रीक्षेत्र जांब, श्रीक्षेत्र शिवथरघळ, श्रीक्षेत्र सज्जनगड, श्री समर्थांचे पसायदान,दासबोध- आत्माराम- करुणाष्टके-मनाचे श्लोक- विविध आरत्या- बलोपासना आदी विविध ठळक घटक या प्रदर्शनात माहिती, चित्रे, रेखांकने व स्टॅन्डी स्वरूपात मांडले. श्री समर्थांच्या समग्र साहित्य संपदेबद्दल विविध लिंक तयार करून त्याचा क्युआर कोड डकवण्यात आला.
सोशल मीडिया टीम हेड ऋग्वेद कुलकर्णी यांनी या समर्थ दर्शनाचा प्रेरणादायी बोधचिन्ह व ग्राफिटी तयार केली. संपूर्ण तीन दिवस भक्तांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन फोटो काढले, क्यू आर कोड स्कॅन केले. वही-पेन घेऊन फिरत माहिती लिहून घेतली. याप्रसंगी व्हा. चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सचिव सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य ॲड. किशोर देशपांडे, संध्या कुलकर्णी, स्वप्निल कुलकर्णी, सुनील जोशी, स्वाती कुलकर्णी, सौ.रागिणी ओहोळ, प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक सुनील कानडे, मुख्याध्यापक अजय महाजन, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी मान्यवर व श्री समर्थ भक्त उपस्थित होते.
