• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरात रंगली शोभायात्रा

ByMirror

Aug 27, 2024
श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरात रंगली शोभायात्रा

समाजबांधवांसह महिला वर्गाची उपस्थिती

राधाकृष्ण मंदिरातील धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून सोमवारी (दि.26 ऑगस्ट) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले. शोभायात्रेतील घोडे व बाळकृष्णची मुर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरली.


युवक-युवतींच्या ढोल पथकाने शोभायात्रेत चैतन्य निर्माण केले. फुलांनी सजवलेल्या मुख्य रथात भगवान श्रीकृष्णाची उत्सव मुर्ती विराजमान होती. भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या शोभायात्रेत शीख, पंजाबी, सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी भजन गाऊन, पारंपारिक वाद्यांवर ठेका धरला होता.


समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक काकाशेठ नय्यर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णची आरतीने शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून निघालेल्या मिरवणुकीत ट्रस्टचे सर्व विश्‍वस्त देखील सहभागी होते. भक्तीमय वातावरणात निघालेल्या शोभायात्रेचे चौका-चौकात स्वागत करुन भाविकांनी श्रीकृष्ण उत्सव मुर्तीचे दर्शन घेतले.

सर्जेपुरा मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ होऊन कापडबाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, तेलीखुंट मार्गे पुन्हा सर्जेपूरा मंदिरा जवळ शोभायात्रेची सांगता झाली. मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मंदिराला आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *