टाटा समुहातील कर्मचारी अधिकारींचे श्रमदानासाठी हात सरसावले
गावांना शाश्वत पाणीदार करण्यासाठीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामासाठी नगर तालुक्यातील माथणी, बाळेवाडी येथे श्रमदान करण्यात आले. पहाटे पासून सुरु झालेले श्रमदान तब्बल चार तास सुरु होते.

टाटा व्हालिन्टरिंग विक 21 निमित्त नगरमधील टाटा समुहातील वेगवेगळ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानात योगदान दिले. यामध्ये गावातील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. शेत शिवारात पावसाचे पाणी अडविण्यासाठी नाला बांधांची कामे करण्यात आली. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकाराने व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या सहकार्याने आणि गावातील पाणलोट क्षेत्र विकास समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
टाटा पॉवर, वर्ल्ड ऑफ टायटन, क्रोमा, तनिष्क आदी टाटा समूहातील कंपन्यांच्या कर्मचारी बांधवांनी या अभियानात हिरारीने सहभाग घेतला होता. भल्या पहाटे श्रमदानास कर्मचारी वर्ग उत्स्फूर्तपणे हजर होते. यामध्ये बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व पॉवरकॉन संस्थेचे पदाधिकारी यांनी देखील सहभाग नोंदवला.

या अभियानाच्या माध्यमातून तीन माती बांध नाले, तीस ते चाळीस दगडी गल्ली व माती नाला बांधांची कामे करण्यात आली. यामुळे पावसाचे पाणी अडवूण गावची पाणी पातळी वाढणार आहे. या जलसंधारणाच्या कामामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा निर्माण होणार असून, जमीनीची होणारी धूप ही मोठ्या प्रमाणात थांबणार आहे. सदर कामामुळे जैववैविधता समतोल राखण्यासाठी मदत होत होवून गावात जनावरांना चारा ही उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
गावांना शाश्वत पाणीदार करण्यासाठी टाटा व्हालिंटरींग विक 21 चे उद्देश श्रमदानाने साध्य केले जाणार असल्याचे श्रमकरी बांधवानी सांगितले. शेवटी पाणी बचतीचा व सामाजिक एकात्मतेचा संदेश सांगणाऱ्या लोकगीताने श्रमदान उपक्रमाचा समारोप कऱण्यात आला. ग्रामस्थांनी टाटा समूहाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.
