शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांची मागणी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना देणार निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहराला पश्चिमेकडे सीना नदीची पुररेषा तर पूर्वेला लष्कराची जमीन व संस्था आहेत. यामुळे शहराच्या विस्ताराला व पर्यायाने विकासालाही मार्यादा पडल्या आहेत. लष्करी संस्थालगत एक मजली बांधकाम करावयाचे असेल तर 100 मीटर तर बहुमजली बांधकाम करावयाचे असेल तर 500 मीटर अंतराचा संरक्षण विभागाचा नियम आहे. शहराच्या विकासाठी संरक्षण विभागने ही अट शिथिल करावी, अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख (दक्षिण) सचिन जाधव यांनी सांगितले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाधव यांनी म्हटले आहे की, नगर शहर व परिसरात लष्कराचे मोठे क्षेत्र आणि संस्था आहेत. या संस्थालगत नागरिकांच्या खासगी मालमत्ता आहेत. मात्र, कडक नियमांमुळे नागरिकांना त्या जागांचा योग्य पद्धतीने विकास करता येेत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच लष्कराच्या बनावट एनओसीचेही प्रकार नगर शहरात घडले आहेत. हे टाळण्यासाठी अंतराची अट संरक्षण विभागानेच शिथिल करावी.
तसेच अहमदनगर महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक दहामधील रामवाडी, कोठला, गोकुळवाडी, कौलारू कॅम्प हे शहरातील मध्यवर्ती भाग आहेत. या भागात 50 वर्षापासून लोकांचा रहिवास आहे. या भागात सर्वसामान्य, गोरगरीब लोक राहतात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी भाग आहे. परिसरातील जागा ही संरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या छावनी परिषदेची आहे. हे क्षेत्र महानगरपालिकेने हस्तांतरित करून घेण्याबाबत संरक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे.
याबाबत संरक्षण विभाग, राज्य सरकार व महानगरपालिका यांनी सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून घेत स्थानिक रहिवाशांना विना मोबदला अथवा नाममात्र दरात जागा नावावर करून द्यावी. याबाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करणार असल्याचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.