सुजित झावर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत करणार प्रवेश
सर्व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर येथे गुरुवारी, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी दिली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्याद्वारे तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना भविष्यातील राजकीय दिशा, निवडणूक रणनीती व संघटनात्मक तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात शिवसेनेची पकड मजबूत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तालुका पातळीवर संघटनात्मक मोर्चेबांधणी, नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि स्थानिक व वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद या सर्व उपक्रमांना या मेळाव्यामुळे नवी गती मिळणार आहे.
सुजित झावरे हे पारनेर तालुक्यातील ओळखलेले नेतृत्व असून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येमुळे शिवसेनेला पारनेर तालुक्यात मोठी राजकीय ताकद निर्माण होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असल्याचे अनिल शिंदे यांनी म्हंटले आहे.
या मेळाव्यास सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
