• Mon. Oct 27th, 2025

शिवसेना प्रवेश निश्‍चित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

ByMirror

Oct 27, 2025

सुजित झावरे हातात घेणार धनुष्यबाण?

जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या पक्षबांधणीने शिवसेनेला बळकटी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर धनुष्यबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षबदलामुळे शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रभाव आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


मुंबईत शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह सुजित झावरे यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


या भेटीमध्ये जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणे, निवडणुका आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीनंतर झावरे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा जोरात असून, त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला ग्रामीण भागात नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे.


अनिल शिंदे यांनी अलीकडच्या काळात शहरातील अनेक माजी नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना शिवसेनेत दाखल करून संघटना बळकट केली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पक्षाची पकड मजबूत होत आहे. आता झावरे यांच्या प्रवेशाने हा विस्तार आणखी गती घेण्याची चिन्हे दिसत आहे.


जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना देखील संघटनात्मक पातळीवर मजबूत पायाभरणी करत आहे. झावरे यांच्यासारख्या अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्याच्या आगमनाने शिवसेनेला निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा विश्‍वास जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वसमावेशक विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. पक्षात येणारे सर्व कार्यकर्ते हे वैचारिक पातळीवर एकत्र येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *