महापालिका निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांचे खच्चीकरण -गौरव ढोणे
पक्षाने शेवटच्या क्षणी डावलल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा खुलासा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत गोंधळ उघडकीस आला असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून एबी फॉर्म न दिल्यामुळे उमेदवारी अपक्ष ठरल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते गौरव ढोणे यांनी केला आहे. माजी आमदार स्व. अनिल राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिक डावलून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
गौरव ढोणे यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून ते शिवसेना पक्षात स्व. अनिल राठोड यांच्या सोबत निष्ठेने कार्य करत होते. यंदा होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली होती. त्यानुसार 29 डिसेंबर रोजी रात्री शहरप्रमुख किरण काळे यांनी उमेदवारीबाबत विचारणा केली. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, दुसऱ्या पक्षांना काही जागा गेल्या असल्या तरी तुमच्यासाठी पक्षाकडून जागा घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर होती. त्या दिवशी आपण महानगरपालिकेच्या जुन्या कार्यालयात उपस्थित होतो. त्यावेळी सहकारी उमेदवारांना मनोज गुंदेजा यांनी स्वतः एबी फॉर्म दिले. मात्र माझा एबी फॉर्म व कव्हर लेटर तेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करतील, असे सांगण्यात आले, असा आरोप ढोणे यांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर करताना आपण वारंवार एबी फॉर्मची मागणी केली. मात्र, ‘तुमचा एबी फॉर्म आधीच जमा केला आहे,’ असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आला. वेळेच्या मर्यादेमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व अर्ज ताब्यात घेतले. परिणामी शिवसेनेचा अधिकृत एबी फॉर्म सादर न झाल्याने प्रशासनाने आपली उमेदवारी अपक्ष म्हणून वैध ठरवली, असे त्यांनी स्पष्ट केले.
एबी फॉर्म प्रत्यक्षात न देता तो जमा केल्याचा खोटा दावा करून आपली दिशाभूल करण्यात आली. अखेरीस आपला अर्ज अपक्ष म्हणून घोषित झाल्यानंतर, नामनिर्देशन अर्जाची पावती मिळाल्यावर उशीर झाल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया जाणीवपूर्वक आखलेल्या कटाचा भाग असल्याचा आरोप गौरव ढोणे यांनी केला आहे.
या प्रकारामागे स्वतःचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि निष्ठावान शिवसैनिकांवर डाग लावण्याचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला. महानगरपालिका निवडणुकीच्या नावाखाली पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असून, वरिष्ठांची दिशाभूल करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कळवण्यात आली असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला प्रत्यक्ष घडलेला प्रकार लेखी स्वरूपात कळविल्याचे गौरव ढोणे यांनी स्पष्ट केले. एबी फॉर्मअभावी अपक्ष ठरलेली उमेदवारी मागे घेतल्याचा खुलासा त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
