अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महिला भाविकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी आणि शनि शिंगणापूर दर्शन घडविण्यात आले. केडगाव येथून देव दर्शन यात्रेला बस पाठविण्यात आल्या. महिला भाविकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अंबिका नगर बस स्टॉप येथून महिला भाविकांसाठी बसची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. या निशुल्क दर्शन सोहळ्याचे प्रारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भाविकांना मोफत श्री क्षेत्र शिर्डी आणि शनि शिंगणापूर दर्शन घडविण्याचा उपक्रम सुरु आहे.
सामाजिक कार्यकर्ते महेश प्रभाकर गुंड यांच्या वतीने केडगाव परिसरातील एकनाथ नगर, अंबिका नगर, पाटील कॉलनी, शाहूनगर आशा विविध भागातून महिलांना या सहलीसाठी पाठविण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून शिर्डी आणि शनि शिंगणापूर येथे उत्तमप्रकारे दर्शन घडविण्यात आले. त्याचबरोबर महिलांना नाष्टा, जेवणची देखील उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.
खासदार विखे यांनी आयोजन केलेल्या सहलीमुळे महिलांना व्हीआयपी पद्धतीने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेता आले. उत्तम व्यवस्थेमुळे साईबाबा आणि शनि देवाचे मनोभावे दर्शन घेतल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. श्री क्षेत्र शिर्डी आणि शनि शिंगणापूर दर्शनासाठी केडगावच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व सोयीयुक्त अशी मोफत दर्शन यात्रा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार सुजय विखे आणि माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्यामुळेच महिलांना एकत्रितपणे दर्शनाचा योग आल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश गुंड यांनी सांगितले. यावेळी शशिकांत आठरे, खाकाळ, उद्योजक जालिंदर कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, डॉ. आशुतोष जोशी, अजित पवार, योगेश दिवटे, योगेश हजारे, भुषण गुंड आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
