सामाजिक परिवर्तनासाठी भापकर गुरुजींचे कार्य व संघर्ष सर्व शिक्षकांसाठी दिशादर्शक -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुष्यभराची पुंजी खर्चून गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधणारे व गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने झटणारे गुंडेगाव (ता. नगर) येथील समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी भापकर गुरुजींचा सत्कार केला. तर सामाजिक परिवर्तनासाठी भापकर गुरुजींचे सामाजिक कार्य व संघर्ष सर्व शिक्षकांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भालसिंग म्हणाले की, गावातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी रस्ता नसल्याने घाम गाळून, शिक्षकी नोकरीच्या निवृत्तीतून मिळालेले पैश्यातून गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधला. महाराष्ट्रातील माऊंटन मॅन म्हणून त्यांची जगाला ओळख झाली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गुंडेगावात बससेवा सुरु व्हावी, यासाठी उपोषण केले, त्याला देखील यश मिळाले. गावात दारूबंदीसाठी त्यांनी संघर्ष केला. समाज घडविताना सर्वस्वी समाजाला अर्पण करुन त्यांनी दिलेले योगदान दिशादर्शक आहे. भापकर गुरुजींसारखे समाजाला दिशा देणारे शिक्षकांची आज खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वयाच्या 93 व्या वर्षात ही समाजासाठी आणखी कार्य करण्याची व शेवटच्या श्वासापर्यंत गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची इच्छा भापकर गुरुजी यांनी बोलून दाखवली. तर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच्या जुन्या आठवणी सांगितल्या. शिक्षक दिनी झालेल्या या सत्काराने त्यांचे डोळे देखील पाणवले.