रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात वाढते धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रतिबिंब लहान मुलांमध्ये उमटत आहे. धार्मिक व सामाजिक ऐक्यासाठी शिक्षकांनाच भूमिका बजवावी लागणार आहे. माणुसकी हीच जात व धर्म असल्याचे शिक्षण देवून मुलांमध्ये प्रेम, शांती, संवेदना जागरुक करण्याचे कार्य करावे लागणार आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आदर्श जीवनमूल्य विकसित करण्याचे आवाहन प्राचार्य अजयकुमार बारगळ यांनी केले.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बारगळ बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्या सुवर्णा वैद्य, माजी पर्यवेक्षिका संतोष मुथा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पुढे प्राचार्य बारगळ म्हणाले की, जगण्याची प्रेरणा केवळ शिक्षणातूनच मिळते. शिक्षणातून किमान संसंस्कृत विद्यार्थी घडला पाहिजे. नैतिक मार्गाने अर्थाजन करण्याचे गुण त्याच्यात विकसीत झाले पाहिजे. शैक्षणिक गुणवत्तेचा जीवनातील यशाशी संबंध नाही. विद्यार्थी असा घडला पाहिजे, तो कुठे गेला तरी चमकलाच पाहिजे. सोशल मिडीयामुळे मुलांच्या मनावर दुष्परिणाम होत असून, डिजीटल युगात शिक्षकांची भूमिका अधिक वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

उपप्राचार्या सुवर्णा वैद्य यांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना दिशा देण्याचे कार्य शिक्षक करत असतात. तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन, जीवनात उभे राहण्यासाठी शिक्षकच बळ देत असल्याचे सांगितले. माजी पर्यवेक्षिका संतोष मुथा यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शिक्षक दिनानिमित्त शाळेत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा व्यवस्थापनाचा व कामकाजाचा अनुभव घेतला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयात आजी-माजी शिक्षक, शिक्षक संघातील सदस्य, संस्थेचे नियमक मंडळातील सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा नारळ व गुलाबपुष्प देवून सत्कार केला. तर यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, शाळा समितीचे सचिव गौरव मिरीकर, सदस्य भूषण भंडारी यांनी शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
