शिक्षण क्षेत्रात सातत्याने देत असलेल्या योगदानाची दखल सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेख फरहत अंजुम अब्दुल समद यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये घेण्यात आलेल्या काव्य संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार निलेश लंके व माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांच्या हस्ते शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे, निमगाव वाघाचे सरपंच लता फलके, कार्यक्रमाचे संयोजक पै. नाना डोंगरे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, कोतवाली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक अश्विनी मोरे, लेखक मिराबक्ष शेख, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते.
शेख फरहत अंजुम अब्दुल समद या घोडेगाव (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. 29 वर्षापासून त्या विद्या दानाचे कार्य करत असून, अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींना शिक्षण क्षेत्राच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष योगदान देत आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने देत असलेल्या योगदानाची दखल घेवून त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी देखील त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
