भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर, निष्ठा व श्रध्दाभाव ठेवावा, त्याशिवाय आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. भारतीय संस्कृतीत गुरुंना महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनासाठी शिक्षक दिशादर्शकाची भूमिका पार पाडत असल्याची भावना प्राचार्य उल्हास दुगड यांनी व्यक्त केली.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दुगड बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, पर्यवेक्षिका आशा सातपुते आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रंथपाल व सेवकांच्या भूमिकेतून एक दिवसाचे शालेय कामकाज अनुभवले. सर्व आजी माजी अध्यापकांचा सत्कार पालक शिक्षक संघातर्फे करण्यात आला. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार केला.
पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत नजान यांनी विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडविण्यासाठी अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. आपल्याला आवड असलेल्या कला, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रात स्वतःला झोकून दिले, तर त्यामध्ये यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर फक्त एक दिवसापुरता न करता आयुष्यभर करण्याचे सांगितले. रविंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानाची सांगड व व्यवहार ज्ञानाशी घालून यशस्वी होण्याचा सल्ला दिला.
स्वराली शित्रे या विद्यार्थिनीने मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले. दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदानाचे कार्य करत शिक्षक होण्याचा आनंद व अनुभव घेतला. श्रेयस पवार याने अध्यक्षीय सूचना मांडली तर रुद्र दर्जे या विद्यार्थ्याने अनुमोदन दिले. ओम मिसाळ याने प्रास्ताविक केले. भाग्यश्री चेमटे या विद्यार्थिनीने अध्यक्षांचा तर धीरज भांड याने अतिथींचा परिचय करून दिला. याप्रसंगी वेदिका दैठणकर हिने मराठीतून तर ओजस कुलकर्णी हिने इंग्रजीतून शिक्षक दिनाची महती सांगितली. स्वराली शित्रे हिने मुख्याध्यापक भूमिकेतील स्वतःचा अनुभव व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी पालक-शिक्षक संघाचे सदस्य, शाळा समिती सदस्य, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पालक शिक्षक संघाच्या सहसचिव ज्योती रामदिन यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचित काबरा व स्वराज गुगळे या विद्यार्थ्यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कैलास साबळे यांनी केले होते.
