• Fri. Feb 6th, 2026

देहदानाने समाजासाठी अमर झाल्या शकुंतलाबाई गुगळे

ByMirror

Feb 5, 2026

92 व्या वर्षी देहदानातून दिला मानवतेचा संदेश


गुगळे कुटुंबियांचा समाजाला प्रेरणादायी आदर्श

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या गुगळे परिवाराने समाजासमोर एक प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक आदर्श निर्माण केला आहे. या कुटुंबातील आधारस्तंभ असलेल्या स्वर्गीय श्रीमती शकुंतला शंकरलाल गुगळे यांचे नुकतेच 92 व्या वर्षी नाशिक येथे निधन झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी पत्र व ऑडिअो कॅसेटद्वारे इच्छा व्यक्त केल्यानुसार त्यांच्या मृत्यू पश्‍चात नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये देहदान करण्यात आले.


यांचे मूळ गाव शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील शंकरलाल, कनकमल, सुवालाल गुगळे व सलाबतपूर निवासी सूरजबाई चूत्तर ही भावंडे , अनेक वर्षांपूर्वी अहिल्यानगर येथे वास्तव होते.स्व शकुंतला गुगळे यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले असले, तरी आपल्या कष्ट, जिद्द आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला उच्च शिक्षणाची वाट दाखवली. धार्मिक वृत्ती असतानाही कर्मकांड, अंधश्रद्धा व जुन्या रूढीपरंपरांना त्यांनी आयुष्यभर विरोध केला.


त्यांचे पती शंकरलाल गुगळे यांनी एका नामांकित कंपनीत सेवा बजावली. त्यांचे सुपुत्र डॉ. अनिल गुगळे हे नाशिकमधील सर्वांत जुने व प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ असून, दुसरे सुपुत्र नितीन गुगळे हे अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असून स्नेहल लुणीया, ज्योती मल्हारा, जयु लुणीया या मुली, संपूर्ण गुगळे कुटुंब उच्चशिक्षित व सामाजिक भान जपणारे आहे. अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य अहिल्यानगर येथे होते. जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगरचे संस्थापक व जायंट्‌स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांच्या मोठ्या काकू (बडी माँ) होते.


विशेष बाब म्हणजे, स्वर्गीय शकुंतलाबाई यांनी वयाच्या 90 व्या वर्षीच नेत्रदान व देहदानाबाबत स्पष्ट इच्छा व्यक्त करणारे पत्र लिहून ठेवले होते. मृत्यूनंतर कर्मकांड न करता आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी यावा, हा त्यांचा ठाम विचार होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे नाशिक येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजमध्ये देहदान करण्यात आले.


यावेळी मेडिकल कॉलेजच्या डिन डॉ. मीनल मोघनकर व डेप्युटी डिन डॉ. धनंजय जाधव उपस्थित होते. त्यांनी देहदान व नेत्रदानाबाबत समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे सांगून, या संदर्भात शासन करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच गुगळे कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन केले.
जायंट्‌स ग्रुपचे संजय गुगळे यांनी जायंट्‌स ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान, नेत्रदान व देहदान चळवळीबाबत आपले विचार व्यक्त केले. स्वर्गीय शकुंतलाबाई यांचे देहदानाबाबतचे उच्च व पुरोगामी विचार समाजाला निश्‍चितच प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्वर्गीय शकुंतलाबाई यांच्या अखेरच्या काळात डॉ. अनिल गुगळे व सौ. सुरेखा गुगळे यांनी अत्यंत प्रेमाने व समर्पित भावनेने त्यांची सेवा केली. आईच्या विचारांप्रती निष्ठा राखत त्यांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण करून समाजासमोर एक दीपस्तंभ उभा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *