प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
आपला गणपती बनवा कार्यशाळेस महिलांचा प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, महिलांनी शाडूच्या मातीपासून आकर्षक पर्यावरण्ापुरक गणेश मुर्त्या साकारल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आपला गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला स्वत: बनवलेल्या गणपती मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापणा घरोघरी करणार आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी पुढे सरसावलेल्या महिलांनी बाळपणाच्या विश्वात रममाण होऊन गणपती बनविण्याचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून लुटला. मातीच्या गोळ्याला आकार देत मूर्तिकार तथा चित्रकार सुजाता पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी आपल्या लाडक्या बाप्पांची इकोफ्रेंडली गणेश मुर्त्या साकारल्या. पायमोडे यांनी अत्यंत सोप्या पध्दतीने गणेश मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर करुन महिलांकडून गणेश मुर्त्या बनवून घेतल्या.

या कार्यक्रमासाठी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड, उपाध्यक्षा वंदना गारुडकर, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, विद्या बडवे, अनिता काळे, छाया राजपूत, सविता गांधी, उषा सोनी, जयश्री पुरोहित, हिरा शाहपुरे, शकुंतला जाधव, मनीषा देवकर, सुजाता पुजारी, मेघना मुनोत, दीपा मालू, ज्योत्स्ना कुलकर्णी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गणेश मुर्ती साकारताच महिलांनी गणपती बाप्पा मोरया..! चा गजर केला. स्वत: बनवलेली पर्यावरणपुरक गणेश मुर्तीला नैसर्गिक रंगांनी रंगवून गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करण्याचा संकल्प महिलांनी केला.

दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षपदी जया गायकवाड यांची सर्वानुमते नियुक्ती करुन त्यांचा यावेळी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. मेघना मुनोत व दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेतील विजेत्या महिला अनिता गोयल, मंगल चोपडा, रिमल गुंदेचा, मोनाली गुगळे, ज्योती गांधी यांना उपस्थित ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बडवे यांनी केले. आभार मनीषा देवकर यांनी मांनले.
