महिलांच्या सक्षमीकरणाची उमंग; महिलांनी महिलांसाठी उभारलेले बाजारपेठीय व्यासपीठ
उमंग फेस्टमधून लाखोंची उलाढाल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आनंदधाम येथील केशर गुलाब मंगल कार्यालयात ‘उमंग 2026 फेस्ट’ चे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे उद्योग-व्यवसाय, वस्त्र, दागिने, घरगुती उत्पादने व विविध वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी महिलांसाठी भरविलेल्या या उमंग फेस्टला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या प्रदर्शनातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शोभातार्इ पोपट पवार, सिमा गुलजारीलाल गुलाटी तसेच हिवरे बाजारच्या सरपंच विमलतार्इ ठाणगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, डॉ. सिमरन वधवा, स्विटी पंजाबी, रितू वधवा, गितांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड, कशीश जग्गी, अन्नू थापर यांच्यासह फाउंडेशनच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फाउंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देणे या उद्देशाने महिला एकत्र येऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून योगदान देत आहेत. विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक सक्षम व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी, यासाठीच ‘उमंग 2026 फेस्ट’ चे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमंग फेस्टमध्ये महिलांनी आपल्या व्यवसायाशी निगडीत खाद्यपदार्थ, हस्तकला, विविध साहित्य, दागिने, वस्त्रांचे आकर्षक स्टॉल्स लावले होते. या स्टॉल्सना महिलांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली. यासोबतच महिलांसाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे फेस्टमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत घेण्यात आली. लहान गटात इयत्ता तिसरी ते सहावी, तर मोठ्या गटात सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध शाळांमधील दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
या चित्रकला स्पर्धेचे परीक्षण समता लोढा यांनी केले. स्पर्धा शबनम धुप्पड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिमरन वधवा यांनी केले, तर आभार अर्चना खंडेलवाल यांनी मानले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कशीश जग्गी यांनी विशेष परिश्रम घेतले.
