शिबिरास ज्येष्ठांचा प्रतिसाद
नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात होणार नेत्र पिढीची स्थापना -डॉ. सुधा कांकरिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत प.पू. आनंदऋषीजी महाराजांचे स्वप्न आदर्शऋषीजींच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. अंधारलेल्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य नेत्र विभाग करत आहे. अंधांची वाढती संख्या व नेत्रदान यामध्ये मोठी विषमता असून, अंधांमध्ये 60 टक्के लहान मुले आहेत. नेत्रदान होत नसल्याने, ते नेत्राच्या प्रतिक्षेत आहेत. नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पिढीची स्थापना केली जाणार आहे. यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळून अनेक अंधाचे जीवनात प्रकाश निर्माण होणार असल्याची भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त साई सूर्य नेत्र सेवा व कांकरिया परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. कांकरिया बोलत होत्या. यावेळी डॉ. प्रकाश कांकरिया, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे, सचिव सुभाष गर्जे, रमेश छाजेड, रत्नप्रभा छाजेड, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, नेत्र विभागातील तज्ञ डॉ. अशोक महाडिक, डॉ. संदीप राणे, डॉ. प्रतीक कटारिया आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नेत्र विभाग तीन जिल्ह्यांना आरोग्य सेवा पुरवित आहे. तज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ व अद्यावत यंत्र सामुग्रीने दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे कार्य सुरु आहे. मोतीबिंदू व इतर डोळ्यासंबंधी 85 हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. 156 लोकांचा टीम या सेवा कार्यात योगदान देत आहे. समाजाची गरज ओळखून सेवाभावाने हे कार्य सुरु आहे. गावातील वाडी-वस्त्यांवर नेत्रालयाची गाडी घेऊन जाऊन त्यांना उपचारासाठी आनले जात आहे. तर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन पुन्हा गावी सोडण्याचे काम सुरु आहे. गावातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे कार्य हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, पुढील वर्षी हॉस्पिटलच्या स्थापनेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा होणार आहे. यानिमित्ताने आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पेढी कार्यान्वीत केली जाणार आहे. समाजात मोठ्या प्रमाणात जागृती करुन नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रेरित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद छाजेड यांनी नेत्रालय विभागातील अद्यावत सोयी-सुविधांची माहिती देऊन लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींच्या डोळ्यांच्या समस्यांवर नेत्र विभागात उपचार केले जात आहे. तर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात असल्याचे सांगितले.
डॉ. प्रतिक कटारिया म्हणाले की, आनंदऋषीजी नेत्रालय विभागात फेको ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून, ते भारतात मोजक्या शहरात उपलब्ध आहे. या सेंटरमध्ये संपूर्ण भारतातून डॉक्टर मंडळी शिकण्यासाठी येत आहे. हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांचा समावेश असून, ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा धाडस दाखवून यशस्वी करत आहेत. हा नेत्र विभाग इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रोटरीचे अध्यक्ष नितीन खाडे यांनी जिल्ह्यात नेत्रदान चळवळ कांकरिया परिवाराने रुजवली असून, आरोग्य क्षेत्रात या परिवाराचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
या शिबीरात 641 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन तज्ञ डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केले. गरजूंवर सवलतीच्या दरात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केला जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
