• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी स्वयंअध्ययन महत्त्वाचे -आशिष येरेकर (जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी)

ByMirror

Oct 4, 2024
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित ठेवून यश मिळेपर्यंत प्रयत्न करावे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी खाजगी शिकवणीवर अवलंबून न राहता स्वयंअध्ययनावर भर द्यावा. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीला मोठा इतिहास असून, थोर समाजसुधारकांच्या विचारातून या संस्थेची उभारणी झाली आहे. शैक्षणिक चळवळीत व भावी पिढीच्या जडणघडणीमध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे. सशक्त देश निर्माणाची ताकद अशा शैक्षणिक संस्थांमध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या संस्थेच्या सर्व विद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात येरेकर बोलत होते. भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या डॉ. मोने कला मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त मंडळाचे सदस्या सुनंदाताई भालेराव, ॲड. किशोर देशपांडे, सल्लागार मंडळाच्या सदस्या आशाताई फिरोदिया, पुष्पलता फिरोदिया, अजय मुथा, हेमंत मुथा, संजय बोरा, भूषण भंडारी, मीना बोरा, जालिंदर बोरुडे, रविंद्र बाकलीवाल, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ आदींसह संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे येरेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना जीवनमूल्य शिकविण्यासाठी शाळांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी कठीण परिस्थितीतून अपयशावर मात करुन आयएस पदापर्यंत मिळवलेले यश विद्यार्थ्यांसमोर मांडले. कलागुण विकसित करा, चांगल्या व्यक्तींच्या सहवासात रहा, आवडीच्या क्षेत्राला करियर बनवण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेला यशाचा कानमंत्र चांगले आचार-विचार, निष्कलंक चारित्र्य, त्याग करण्याची क्षमता व अपमान सहन करण्याची शक्ती हे गुण विद्यार्थ्यांना सांगितले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्था 136 वर्षापासून अतिशय कार्यक्षमतेने व यशस्वीपणे चालवली जात असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.


प्रारंभी बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांनी संचलन करुन पाहुण्यांचे स्वागत केले. स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी संस्थेत काळाची पाऊले ओळखून विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होण्यासाठी सर्व शिक्षक योगदान देत आहेत. शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त व गुणवत्तेने संस्थेचा राज्यात नावलौकिक झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक अजय बारगळ यांनी करुन दिला.


मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच संस्थेतील गुणवंत शिक्षक व शाळांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन प्राचार्य उल्हास दुगड यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापिका आशा सातपुते, पर्यवेक्षक विष्णू गिरी, बाळासाहेब वाव्हळ, कैलास साबळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी क्षीरसागर व अमेय कानडे यांनी केले. आभार मुख्याध्यापक प्रभाकर भाबड यांनी मानले. संगीत शिक्षक परशुराम मुळे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *