महाराष्ट्राच्या संघाचे करणार प्रतिनिधित्व
अहमदनगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने नाशिक येथे 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठ येथील सहा महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे सहा खेळाडू महाराष्ट्राच्या संघात खेळणार असून, त्यांनी राज्य स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर निवड झाली आहे.
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्वामिनी जेजुरकर, अक्षदा बेल्हेकर, सिमरन शेख, ऐश्वर्या चौरसिया, मृणाल ननवरे, वृषाली पारधी या खेळाडूंची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडू असून, त्या क्रीडा शिक्षक व क्रिकेट प्रशिक्षक घनश्याम सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.तसेच टी.सी.ए. क्रिकेट क्लबचे श्रीकांत तिरमल यांचेही त्यांना मार्गदर्शन असते.
टेनिस क्रिकेट हा खेळ शालेय क्रीडा महासंघ, व क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे मान्यता प्राप्त खेळ असून, शालेय स्तरावर 14, 17, 19 वर्षे वयोगट मुले, मुली या वयोगटात हा खेळला जातो. राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे यशस्वी विद्यार्थिनींचे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंदजी माने, अधिष्ठाता रसाळ, खजिनदार महेश घाडगे, विद्यार्थी कल्याणचे प्रमुख डॉ. महावीर सिंग चौहान, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी विलास आवारी, विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
