• Wed. Feb 5th, 2025

कवयित्री सरोज आल्हाट यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड

ByMirror

Jan 11, 2025

जिल्ह्यातून एकमेव निमंत्रित कवी होण्याचा बहुमान

नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातून निमंत्रित करण्यात आलेल्या त्या एकमेव कवयित्री असण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुभाषिक कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांची नियुक्ती केल्याची माहिती सरहद पुणेचे राहुलजी मेंगडे व देशपाल जवळगे यांनी पत्राद्वारे आल्हाट यांना कळविले आहे.


सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे होणार असून, स्वागत अध्यक्ष ना. शरद पवार व संमेलन अध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर उपस्थित असणार आहेत.


सरोज आल्हाट वयाच्या दहाव्या वर्षापासून लिखाण करत असून, त्यांचे चार मराठी व एक इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *