राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगणार काव्यांची मैफल
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी उद्योजक बाळासाहेब शहाणे यांची निवड करण्यात आली आहे.
नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 14 जानेवारी रोजी नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी शहाणे यांची निवड करुन संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
बाळासाहेब शहाणे हे उद्योजक असून, महाराष्ट्र सुवर्णकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. ते नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे संमेलनाचे संयोजक पै. डोंगरे यांनी म्हंटले आहे.
काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहाणे यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, काव्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत पालवे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, डॉ. विजय जाधव, प्रा. गणेश भगत, जालिंदर बोरुडे, अनिल डोंगरे, कवियत्री शांता मरकड, जयश्री मंडलिक यांनी अभिनंदन केले आहे.
