• Sat. Feb 28th, 2026

निमगाव वाघात सावित्रीच्या लेकींनी फुलवला स्त्री शिक्षणाचा जागर

ByMirror

Jan 6, 2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत रंगली वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा


स्त्री शिक्षणाने समाजात क्रांती घडवली -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री शिक्षण, समानता व सामाजिक परिवर्तनाचा जागर करण्यात आला. नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या निमित्ताने विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित वेशभूषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबार्इंच्या वेशभूषेत साकारलेल्या विद्यार्थिनींनी “मुलगी वाचवा मुलगी शिकवा” असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या त्याग, संघर्ष व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांची मने जिंकली.


कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. शिक्षिका स्वाती इथापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, तेजस केदारी, शरद भोस, निकिता रासकर-शिंदे, रेखा जरे-पवार, दिपाली ठाणगे, आप्पासाहेब कदम, ग्रंथपाल बाळासाहेब कोतकर, संदीप डोंगरे, प्रशांत जाधव, तुकाराम पवार, लहानु जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण संस्थेच्या सचिव सुमन कुरेल यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी केले. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना पै. नाना डोंगरे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याची बक्षिसे प्रदान करण्यात आली.


यावेळी बोलताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या पिढीने सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. स्त्री शिक्षणामुळेच समाजात खरी क्रांती झाली आहे. प्रवाहाविरुद्ध जाऊन समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबार्इंचे योगदान आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नांमुळे महिलांना शिक्षण, समानता व स्वातंत्र्याचा मार्ग मिळाला. समाजाच्या शिव्याशापाला न जुमानता त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्याचे त्यांनी सांगितले.


स्वाती इथापे म्हणाल्या की, आजची कर्तृत्ववान स्त्री ही सावित्रीबार्इंच्याच कार्याचे फलित आहे. ज्योतीराव फुले यांच्या पश्‍चात सत्यशोधक चळवळीची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलवली. जातीय भेदभाव, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्या अखेरच्या श्‍वासापर्यंत लढत राहिल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *