आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष
रॅली, नृत्य, वेशभूषा स्पर्धेतून आदिवासी अस्मितेचा जागर
नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन सावेडी उपनगरात उत्साहात साजरा करण्यात आला. आदिम संस्कृतीचा ठसा उमटवणारी रॅली, पारंपरिक नृत्य, आदिवासी वेशभूषा व विचार-संस्कृतीवरील स्पर्धा या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपली समृद्ध परंपरा, अस्मिता आणि सांस्कृतिक वैभव नगरकरांसमोर सादर केले.
थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना अभिवादन करून प्रोफेसर चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. वाद्यांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला-पुरुषांच्या सहभागामुळे रॅलीत रंगत आली. जल, जंगल, जमीन आमचा हक्क, आमचा जीव या घोषणांनी परिसर दुमदुमला. रॅली मार्गावर उभे असलेल्या नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला.
रॅलीचा समारोप भस्तबाग महालाजवळील श्रेयस लॉन येथे झाला. येथेच मुख्य कार्यक्रम पार पडला. या वेळी रंगतदार आदिवासी नृत्यप्रस्तुतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या नृत्यातून निसर्गाशी एकरूप जीवनपद्धती, परंपरा व लोककला यांची झलक पहायला मिळाली. कार्यक्रमात आदिवासी वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थी तसेच आदिवासी बालकलाकारांचा सन्मान करण्यात आला.
वेशभूषा, नृत्य व विचार-संस्कृती या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.
प्रमुख पाहुणे प्रभाग अधिकारी एस.बी. तडवी यांनी आदिवासी हा निसर्ग पूजक, प्रकृती रक्षक व पर्यावरण संरक्षक आहे. जल-जंगल-जमीन यांचे जतन हीच खरी आदिवासींची जीवनशैली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ गवांदे यांनी आदिवासींच्या संघर्षमय इतिहासाची माहिती दिली. या कार्यक्रमात राहता, शिर्डी, अकोले, पारनेर, राहुरी, पाथर्डी या तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कोरडे यांनी केले. आभार संतोष नवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
