• Sun. Mar 1st, 2026

सौंदाळा ग्रामपंचायतीचा भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरव

ByMirror

Mar 1, 2026

“जातमुक्त” ठराव घेतल्याबद्दल शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम सामाजिक विचारमंचाच्या वतीने सन्मान


सौंदाळा ग्रामपंचायतीचा निर्णय संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी -अशोक शिंदे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेच्या दिशेने नेवासा तालुक्यातील मौजे सौंदाळा ग्रामपंचायतीने “जातमुक्त” ठराव घेतल्याबद्दल शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम सामाजिक विचारमंचाच्या वतीने ग्रामपंचायतीचा विशेष गौरव करण्यात आला.


सामनगावच्या माजी सरपंच मीनाक्षी कांबळे यांच्या हस्ते सरपंच शरद आरगडे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आरगडे, भिवसेन गरड, सचिन आरगडे, लक्ष्मण आरगडे, बाळासाहेब आरगडे, भाऊसाहेब आरगडे तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, आरोग्य सेविका शालनताई जाधव, महिला अध्यक्षा उषाताई शिंदे, मिलिंद कांबळे, गणेश ढोबळे, सुनील सकट, युनूस पठाण, मोहम्मद पठाण, अर्शद पठाण, अमोल आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.


अशोक शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सौंदाळा ग्रामस्थांनी गावात कुणाच्याही जातीचा उल्लेख करायचा नाही व जात मानायची नाही, फक्त “माणूस” हीच जात मानायची, असा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. हा ठराव केवळ गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. यापूर्वीही गावाने अनेक सामाजिक सुधारणा राबवल्या आहेत. गावात “शिवी देणे बंदी”चा ठराव संमत करून शिवी देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद करण्यात आली आहे. निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच मुलींच्या विवाहासाठी ग्रामपंचायतीमार्फत निश्‍चित आर्थिक मदत देण्याची योजना कार्यान्वित आहे. अशा अनेक लोकहितवादी आणि प्रगत नियमांचे काटेकोर पालन संपूर्ण गाव करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


सरपंच मीनाक्षी कांबळे म्हणाल्या की, देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी जात-धर्मापेक्षा राष्ट्रीयत्वाची भावना श्रेष्ठ मानण्याचा संदेश दिला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही आपण जाती-धर्माच्या बंधनात अडकून राहिलो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र सौंदाळा ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर जातबंदीचा ठराव घेऊन संविधानाला पूरक असे कार्य केले आहे. हा निर्णय खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.


सौंदाळा ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावाचे नाव राज्यस्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आले आहे. सामाजिक समतेचा मार्ग स्वीकारत गावकऱ्यांनी उचललेले हे पाऊल भविष्यात इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम सामाजिक विचारमंचाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *