परावलंबी व दुर्धर व्याधींनी पीडितांसाठी पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांच्या गार्डियन एंजल्स या प्रकल्पातर्फे दुर्धर व्याधींनी पीडित रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य गृह सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना सेवा देण्यासाठी संस्थेने कार्य सुरु केले आहे.
अर्धांगवायू, कॅन्सर पार्किन्सन्स यासह इतर व्याधींनी पीडितांची वैयक्तिक स्वच्छता, दैनंदिन क्रिया, व्यायाम, आहार या व रुग्णांच्या इतर गरजा संस्थेच्या केअरटेकर मार्फत पुरविल्या जातात. सरोज अल्हाट यांनी आई, मावशी व घरातील इतर आजारी सदस्यांना सेवा देताना काळाची गरज ओळखून सामाजिक बांधिलकी हेतू, त्यांच्या स्मरणार्थ हा प्रकल्प सुरू केला आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांना सेवा दिली.
या प्रक्रियेत त्या स्वतःही व्यक्तिशः रुग्ण सेवा करतात. त्यांचे समुपदेशन, सकारात्मकता निर्माण करणे याद्वारे रुग्णांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करतात. नातेवाईकांनाही मार्गदर्शन करतात. एकल, घटस्फोटीत विधवा, गरजू महिलांना व मुले यांना प्रशिक्षण देऊन काम दिले जाते. प्रशिक्षित वैद्यकीय स्टाफही उपलब्ध आहे. मिळालेले नाममात्र शुल्क त्यांना मानधन म्हणून दिले जाते. गरजूंनी सदर सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
