14 वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने पटकावले विजेतेपद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेत सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी या लोकप्रिय क्रीडाप्रकारात घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 14 वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी संघभावना, चपळता, डावपेच आणि शिस्तबद्ध खेळ यांचा उत्तम समन्वय साधत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. यामुळे सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही विविध क्रीडाप्रकारांमध्ये विभागीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून, सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशाबद्दल आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद द्विगुणित झाला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला.
शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, शिस्त आणि नियमित सराव महत्त्वाचा आहे. क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. भविष्यातही विद्यार्थी याचप्रमाणे उज्ज्वल यश संपादन करतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. या विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा मार्गदर्शक अविनाश साठे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
