• Thu. Oct 30th, 2025

सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या दहावीतील गुणवंतांचा सत्कार

ByMirror

Jun 22, 2024

शालेय शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी शिक्षणासाठी झाले पुन्हा प्रवेशित

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूल मधील इयत्ता दहावी बोर्डातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तर बिकट परिस्थितीने शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला असता त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन स्वागत करण्यात आले.


सरस्वती मंदिर नाईट स्कूलमध्ये अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापिका शुभांगी कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. कुंभार म्हणाल्या की, संघर्षातूनच यशस्वी जीवनाची वाटचाल होते. परिस्थितीने घाबरणारे ध्येय प्राप्ती करु शकत नाही. शिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल राहणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी परिस्थितीवर मात करुन इयत्ता दहावीमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी शिक्षण हे बदलाचे प्रभावी माध्यम असून, अनेक सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांनी नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन परिस्थितीवर मात केली आहे. सध्याच्या युगात नाईट स्कूल मधून दिले जाणारे शिक्षणाचे महत्त्व विशद करुन नाईट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सोयी-सुविधांची त्यांनी माहिती दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले. आभार देवका लबडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन विणा कुऱ्हाडे, सुषमा धारूरकर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी राजू भुजबळ, मासूम संस्थेचे प्रतिनिधी महेंद्र म्हसे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध गीते, मानद सचिव निलेश वैकर, मानद सहसचिव चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *