आदिवासींच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बिगर आदिवासींनी आदिवासी शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) संगमनेर शहरातील प्रांत अधिकारी कार्यालया समोर आदिवासी काळी आई मुक्ती घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात आदिवासी काळी आई मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भास्कर दूधवडे, सचिव किशोर दूधवडे, ॲड. कारभारी गवळी, गोपीनाथ दूधवडे, जिवबा दूधवडे, दिनेश दुधवडे, मंदाबाई दुधवडे, रखमाबाई दुधवडे आदींसह आदिवासी समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.
गेलेल्या जमीनी परत मिळण्यासाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनीवर कब्जा करुन त्यांच्या हक्कावर गदा आणली जात असताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील मुळा नदी शेजारची गट नंबर 775 मधील 11 हेक्टर 22 जमीन पैकी मूळ आदिवासींच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन 9 हेक्टर 62 आर जमीन लाटण्यात आली. बागायती जमीनीपैकी सन 1990 साली शंकर महादू तांगडकर यांनी आदिवासींपैकी जमिनीशी संबंध नसलेल्या भिमाजी दुधवडे यांच्या मदतीने मुळ आदिवासी मालकांना फसवून तलाठी व सर्कल यांना हाताशी धरुन फेर नं. 535 मंजूर करुन घेतला. त्यामध्ये 2 हेक्टर 57 आर जमीन बिगर आदिवासी शंकर तांगडकर यांनी त्यांची बायकोच्या नावे केली. तर भिमाजी दुधवडे यांनी स्वत: व मुलाच्या नावे 2 हेक्टर 87 एवढी जमीन केली. व इतर लोकांनी अशी 9 हेक्टर 62 आर जमीन लाटली. फक्त आदिवासी मुळ मालकांच्या नावावर 1 हेक्टर 20 आर जमीन ठेवली आहे. आदिवासींच्या मागासपणाचा फायदा घेवून मुळा नदीकाठच्या बागायती जमीन बिगर आदीवासींनी लाटल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

आदिवासींचा मागासलेपणाचा फायदा घेवून त्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या आहे. मूळ आदिवासींच्या जमिनी परत करा, जमिनी बळकवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन तहसिलदार धीरज मांजरे व नायब तहसिलदार श्रीकांत लोमटे यांना देण्यात आले.
