आदिवासी शेतकऱ्यांच्या बिगर आदिवासींनी लाटलेल्या जमीनी परत मिळवण्याची मागणी
पीपल्स हेल्पलाईनच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- बिगर आदिवासींनी आदिवासी शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) संगमनेर शहरातील प्रांत अधिकारी व तहसिल कार्यालया समोर सकाळी आदिवासी काळी आई मुक्ती घंटानाद केला जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनीवर कब्जा करुन त्यांच्या हक्कावर गदा आणली जात असताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. तर यावेळी आदिवासी शोषित समाजाच्या उन्नतीसाठी सुर्यसाक्षी राष्ट्रीय कृतीपंचक जारी केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील मुळा नदी शेजारची गट नंबर 775 मधील 11 हेक्टर 22 जमीन पैकी मूळ आदिवासींच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन 9 हेक्टर 62 आर जमीन लाटण्यात आली. बागायती जमीनीपैकी सन 1990 साली शंकर महादू तांगडकर यांनी आदिवासींपैकी जमिनीशी संबंध नसलेल्या भिमाजी दुधवडे यांच्या मदतीने मुळ आदिवासी मालकांना फसवून तलाठी व सर्कल यांना हाताशी धरुन फेर नं. 535 मंजूर करुन घेतला. त्यामध्ये 2 हेक्टर 57 आर जमीन बिगर आदिवासी शंकर तांगडकर यांनी त्यांची बायकोच्या नावे केली. तर भिमाजी दुधवडे यांनी स्वत: व मुलाच्या नावे 2 हेक्टर 87 एवढी जमीन केली. व इतर लोकांनी अशी 9 हेक्टर 62 आर जमीन लाटली. फक्त आदिवासी मुळ मालकांच्या नावावर 1 हेक्टर 20 आर जमीन ठेवली आहे. आदिवासींच्या मागासपणाचा फायदा घेवून मुळा नदीकाठच्या बागायती जमीन बिगर आदीवासींनी लाटल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
आदिवासींचा मागासलेपणा व मानसिक गुलामगिरी कायमची संपविण्यासाठी शिक्षणाचा आग्रह, कायद्याने क्रांति करण्याची भूमिका, आत्मविश्वास, सततची आत्मजागृती आणि संघटित संघर्ष करण्याची तयारी हे तत्व राष्ट्रीय कृतीपंचक मध्ये समावेश करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी काळी आई मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भास्कर दुधवडे, सचिव किशोर दुधवडे, गोपीनाथ दुधवडे, जिवबा दुधवडे, दिनेश दुधवडे यांनी पुढाकार घेतला आहे.
