शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा नष्ट होत असल्याचा आरोप
ऐतिहासिक वास्तूंना संरक्षण देऊन दुरुस्ती करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा नष्ट होत असताना, पुरातत्व विभाग हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करुन समाजवादी पार्टीच्या वतीने जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन पुरातत्व विभागाच्या चालढकल कामाचा निषेध नोंदविण्यात आला. समाजवादीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आसिफ रजा, अल्ताफ लकडावाला, तन्वीर सय्यद, गनी राज, मतीन खान, एजाज हाजी, तन्वीर बागबान, रफिक बाबुलाल, मुनीर शेख, कलीम शेख, सईद खान, रशीद कुरेशी, समी अहमद, सरफाराज शेख, समीर बिल्डर आदी सहभागी झाले होते.
नुकताच शहराचा 535 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. शहराला मोठा ऐतिहासिक ठेवा लाभला आहे. ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा जतन करण्याची व त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. मात्र या विभागाकडून शहरातील ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष केले जात आहे. बागरोजा येथे शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या समाधी स्थळाकडे जाणारा रस्ता नाही. इतर ऐतिहासिक वास्तूंची पडझड देखील झाली आहे. नियामत खानी गेटची दुरुस्ती गरजेची असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्याच्या चहुबाजूंनी तळीराम बसलेले असतात. फराहाबाग येथील वास्तूची देखील गंभीर अवस्था झाली असून, या ऐतिहासिक वास्तूंची देखरेख आणि त्यांना सुरक्षा प्रदान न करता पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचे म्हंटले आहे.
शहरातील ऐतिहासिक वास्तूंना संरक्षण द्यावे, पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची दुरुस्ती करुन त्याचे जतन करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.