• Fri. Mar 14th, 2025

समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

ByMirror

Jul 20, 2024

विशाळगडाच्या पायथ्याशी मुस्लिम समाजाच्या घरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा, पूर्वनियोजित व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडावर अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरांव करण्यात आलेल्या हल्ल्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शनिवारी (दि.20 जुलै) निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा असून, दंगलीचा हैदोस पूर्वनियोजित व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.


या आंदोलनात समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन, आसिफ रजा, अजहर काजी, हारुन खान, अल्ताफ लक्कडवाला, एजाज सहारा, मोसिन शेख, मुनाफ शेख, अपाक शेख, इकराम तांबटकर, सैफ शेख, एजाज शेख, रफिक शेख, गनी शेख, मुनाफ शेख, मुनाफ बागवान, हाजी अजमत, सद्दाम शेख, समीर तांबटकर, तन्वीर खान आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी घटना 14 जुलै रोजी कोल्हापूरच्या विशाळगडावर घडली आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली निवडक मुस्लिमांना टार्गेट करून राज्य सरकारच्या राजाश्रयाखाली व पोलीसांच्या नजरेसमोर मुस्लिमांवर अमानुष अत्याचार करण्यात आला. मस्जिद व प्राचीन दर्गाची प्रचंड नासधूस तथाकथित शिवप्रेमींनी केली. या सर्व घटनेस राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करुन या घटनेचा समाजवादीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.


काही संबंध नसताना मुस्लिमांची घरांवर दगडफेक करुन त्यांची दुकाने व गाड्या जाळण्यात आली. मस्जिद तसेच 14 व्या शतकातील प्राचीन दर्गावर प्रचंड दगडफेक करून त्याचे मिनार, गुंबद हातोड्याने तोडण्यात आले. महिला व लहान मुलींना देखील निर्लज्जपणे मारहाण करण्यात आली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारने समस्त मुस्लिम समाजाची त्वरित भरपाई देऊन माफी मागण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


वास्तविक विशाळगडावर कित्येक वर्षापासून अतिक्रमणे झालेले असून, ती पाडण्याची जबाबदारी गुंडीशाहीची नसून राज्य सरकारची आहे. सुमारे 158 अतिक्रमण असून, त्यात फक्त मुस्लिमांची नव्हे तर इतर धर्मियांची पण आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभावाचे खापर व बदला घेण्यासाठीच मुस्लिम समाजाला टार्गेट करुन हल्ला करुन दंगल घडविण्यात आली आहे. हा प्रकार पोलिसांच्या नजरेसमोर घडला असून, सदर दंगल व हल्ला पूर्वनियोजित होता. आगामी विधानसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारण करून हिंदू-मुस्लिमांमध्ये जातीय तेढ निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा जातीवादी शक्तीचा डाव पुन्हा एकदा हाणून पाडण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, मुस्लिमांच्या मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आले असून, तातडीने त्याचे पंचनामे करून पीडित मुस्लिमांना भरपाई द्यावी, दंगलखोरांवर 307, 452, 295 (अ), 153 (अ), 384, 4/25 आर्मॲक्ट कलमान्वये गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *