राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध
न्यायालयाचा आदेश धुडकावून दर्गाहमध्ये घुसखोरी; मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच दर्गाहचे पवित्र्य अबाधित राखण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. निवेदनात या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
राहुरी येथे सुमारे 400 वर्षांपूर्वी सुफी चिश्ती सिलसिलेचे हजरत सय्यद अहमद चिश्ती यांची दर्गाह असून, ही दर्गाह 1953 सालापासून चॅरिटी कमिशन कार्यालयात नोंदणीकृत आहे. तसेच 1995 च्या वक्फ कायद्यानुसारही दर्गाहची विधिवत नोंदणी करण्यात आलेली आहे. असे असताना काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने न्यायालयाचा स्टे ऑर्डर असतानाही बेकायदेशीर मार्गाने दर्गाहमध्ये प्रवेश केला.
या समाजकंटकांनी दर्गाहच्या पवित्र स्थळाची विटंबना करत जातीयवादी व द्वेषपूर्ण घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झाले असून मुस्लिम समाजामध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दर्गाह ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच जिल्हाधिकारी व अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेचा समाजवादी पार्टीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने व सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करावी, तसेच दर्गाह परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
