अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात समाज जागृतीचे कार्य केले -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नेहरु युवा केंद्र, नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, अमोल वाबळे, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, तृप्ती वाघमारे, राम जाधव, बाळासाहेब कोतकर, लहानु जाधव, संदीप डोंगरे आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक वर्गासाठी संघर्ष केला. श्रमिक वंचितांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी शाहिरीतून समाज जागृतीचे कार्य केले. वयाच्या सोळाव्या वर्षी कामगार चळवळीत सहभागी होऊन त्यांनी कष्टकरींच्या व्यथा मांडल्या. त्यांचे लिखाण मानवी जीवनाला नवा विचार देणारे आहे.
तर लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीशांविरोधात समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. दोन्ही महापुरुषांनी अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
