• Thu. Oct 30th, 2025

सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्टची महेश मुनोत विद्यालयास झेरॉक्स-प्रिंटिंग मशिनची मदत

ByMirror

Sep 23, 2023

ट्रस्टचे अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी असलेले कोठारी यांची सामाजिक बांधिलकीतून मदत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास अद्यावत झेरॉक्स-प्रिंटिंग मशिन मदत स्वरुपात देण्यात आली.


सध्या सर्व स्पर्धा परीक्षा, बोर्ड परीक्षा, शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाइन भरले जातात. सदर अर्जाची प्रिंट काढण्यासाठी विद्यालयाला सातत्याने झेरॉक्स/प्रिंटिंग मशिनची आवश्‍यकता भासत होती. विद्यार्थ्यांना विविध अर्ज सायबर कॅफेत जावून भरणे अशक्य व परवडणारे नव्हते. विद्यार्थ्यांची गरज ओळखून सक्कर-मोहन ट्रस्टने वांबोरी (ता. राहुरी) येथील महेश मुनोत विद्यालयास झेरॉक्स-प्रिंटिंग मशिन उपलब्ध करुन दिली.


ट्रस्टचे अध्यक्ष चंपालालजी कोठारी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, मुंबई येथील उच्च न्यायालयात सिनिअर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अत्यंत गरीब परिस्थितीमधून या शाळेत शिक्षण पूर्ण केलेले असल्याने परिस्थितीची जाणीव ठेवून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही मदत केली आहे. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून या शाळेस सातत्याने शैक्षणिक मदत दिली जात आहे. दहा वर्षांपूर्वी इ.9 वी ते इ.12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी बूक-बँक योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी दीड हजार वह्यांचे वाटप करण्यात येते. आर्थिक दुर्बल घटक असलेल्या दहावी व बारावी बोर्डातील गरजू विद्यार्थ्यांची फी देखील ट्रस्टच्या माध्यमातून भरली जात आहे.


ट्रस्टचे अध्यक्ष चंपालालजी कोठारी यांनी देशाचे एक चारित्र्यसंपन्न, यशस्वी नागरीक बनण्यासाठी शिक्षण आवश्‍यक आहे. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होतात. म्हणूनच, ट्रस्टमार्फत विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत केली जाते. आपल्या आई-वडिलांविषयी असणारा आदरभाव व्यक्त करत, विद्यार्थ्यांनीही शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केले.


ट्रस्टचे मॅनेजिंग डायरेक्टरआशिष कोठारी यांनी देखील शिक्षणाद्वारे जीवनातील उत्तम ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे शुभेच्छा संदेशाद्वारे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाला समितीचे को-चेअरमन हेमंत मुथा यांनी चंपालालजी कोठारी व परिवाराचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन स्वतः प्रगती करून समाजाचे ऋण फेडण्याचा आदर्श समोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे सांगितले. तर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीबद्दल आभार मानले.


विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एल. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून ट्रस्टच्या मदतीची परतफेड करण्याचे आवाहन केले. तर या मदतीचा उपयोग करून विद्यार्थी आपली निश्‍चितच प्रगती साधणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक रविकिरण भांड व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *