• Fri. Sep 19th, 2025

निमगाव वाघा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात

ByMirror

Sep 5, 2025

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक व प्रतिभावंतांचा गौरव


साहित्य समाजातील संस्कारांचा आरसा -पल्लवी उंबरहंडे-देशमुख

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी (दि.5 सप्टेंबर) तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर काव्य संमेलनात शिक्षकांवर कविता रंगल्या होत्या.


माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र फंड, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड कार्यक्रमाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सरपंच उज्वलाताई कापसे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, कवी गीताराम नरवडे, आनंदा साळवे, भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे, डॉ. सुनिल गंधे आदींसह साहित्यिक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी फक्त फोटोला हार घालण्यापूर्ती साजरी न करता त्याला सामाजिक उपक्रमाची जोड दिली जात आहे. ग्रामीण मराठी साहित्य संमेलन घेऊन साहित्य चळवळीला प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तर या संमेलनाच्या माध्यमातून भावी पिढी पर्यंत महापुरुषांचे विचार रुजविले जात आहे. संमेलनात विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा गौरव करुन त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख म्हणाल्या की, साहित्य फक्त शब्दांची जुळवाजुळवी नसून, समाजातील संस्कारांचा आरसा आहे. समाजातील ज्वलंत प्रश्‍न प्रखरपणे मांडण्याचे ते मुख्य साधन आहे. नवीन पिढी साहित्य आणि वाचन संस्कृतीशी जोडली जावी, यासाठी अशा संमेलनाची गरज आहे. अभासी जीवनात रंगलेल्यांना साहित्यातून जागरूक करण्याची जबाबदारी साहित्यिकांवर आहे. समाज हिताच्या दृष्टीने साहित्यिकांनी समाजाला विचार देण्याचे त्यांनी आवाहन केले.


स्वागताध्यक्ष ॲड. राजेश कातोरे म्हणाले की, मराठी साहित्याला समृद्ध संतांची परंपरा आहे. साहित्य समानतेची शिकवण देते. साहित्यच्या वाचनातून माणुस घडतो. जातिवाद, धर्मवाद व लिंगभेद नष्ट करण्यासाठी साहित्य चळवळ प्रभावी करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. सुरेश लगड यांनी समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून उतरत असते. तर साहित्याने समाजात क्रांती घडत असते. यामुळे समाजात साहित्याला महत्त्व असल्याचे त्यांनी विशद केले.


सकाळच्या सत्रापासूनच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने रंगली होती. बाळासाहेब देशमुख कथाकथनचा कार्यक्रम झाला. काव्य संमेलनात ज्येष्ठ आणि नवोदित कवींच्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली. विविध सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण आणि शिक्षकांवर सादर करण्यात आलेल्या कवितांना भरभरून प्रतिसाद मिळाला. कवी गोकुळ गायकवाड, जयश्री सोनवणे, बाळासाहेब मुन्तोडे, हेमलता गीते, रुपचंद शिदोरे, बाळासाहेब कोठोळे, आत्माराम शेवाळे, त्रिंबक देशमुख, चंद्रकांत चाबुकस्वार, देवीदास बुधवंत आदी कवींनी काव्य संमेलनात सहभाग नोंदवला. गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. विजय जाधव, ॲड. ऐश्‍वर्या काळे, अतुल फलके, उद्योजक दिलावर शेख, सुमित्रा छजलाने, वसुधा देशपांडे, अभी पाचारणे, अजय ठाणगे, हुसेन शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक संदीप रासकर यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *