• Wed. Oct 29th, 2025

वाढते जातीय अत्याचार व हरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाईचे अर्धनग्न आंदोलन

ByMirror

Sep 1, 2023

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात मडका व कंबरेला खराटा बांधून पूर्वीच्या जातीय व्यवस्थेचे दर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाढते जातीय अत्याचार तर नुकतेच हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीय समाजाला आजही जातीय गुलामगिरीत अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पूर्वीप्रमाणे गळ्यात मडका व कंबरेला पाठीमागून बांधलेला खराटा बांधून जातीय व शासन व्यवस्थेचा धिक्कार करण्यात आला.


या आंदोलनात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, जमीर सय्यद, विजय शिरसाठ, अजीम खान, रवी कानडे, नईम शेख, अरबाज शेख, सुफियान काझी, इम्रान शेख, सचिन शिंदे, प्रकाश भाटेजा, संदीप वाकचौरे, सुधीर गायकवाड, गुलाम शेख, सुमित पाडळे, शहेबाज शेख, सद्दाम शेख, जिया शेख, विनीत पाडळे, उमेश गायकवाड, सुशील म्हस्के, संपदा म्हस्के, ज्योती पवार, अलका बोर्डे, पूजा साठे, मनिषा गायकवाड, संगिता उल्हारे, सोनाली बनसोडे, संगिता पाटोळे, चिकू गायकवाड, सुरेश काळे, तुषार भालेराव, जावेद सय्यद, आकाश काळे, फ्रान्सिस पवार आदींसह रिपाईचे कार्यकर्ते व महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.


महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागासवर्गीय समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. नुकतेच कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर लघवी करुन त्यांना बुटांवरील थुंकी चाटण्यात लावली गेली. हा प्रकार जातीय अत्याचारातून घडलेला आहे. मागासवर्गीय समाजाला आजही स्वातंत्र्य मिळालेले नाही. आजही त्यांना जातीय व्यवस्थेत गुलाम बनवून ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हरेगाव येथील घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून, या घटनेची नैतिक जबाबदारी राज्य शासनाने घेणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या प्रकरणात संवेदनशीलता दाखवली नाही. या प्रकरणात एक शब्दही न उच्चारता झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणात पिडीत मुलांच्या कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री शहरात आल्यास त्यांच्य समोर नग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


देशासह महाराष्ट्रात जाती अत्याचाराच्या घटना घडत असताना ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केल्यास त्यामधील आरोपींना त्वरित अटक केली जात नाही. ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीवरच खोटे गुन्हे नोंदविण्यात येतात. पोलीस प्रशासन ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होण्यासाठी अनेक वेळा आंदोलन, उपोषण करावे लागते. हा कायदा कमकुवत करण्याचे काम केले जात असताना, जातीवादी प्रवृत्तींना वचक बसवण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा, हरेगाव येथील प्रकरणातील मुख्य आरोपी नाना गलांडे फरार असून, त्याला त्वरित अटक करावी व सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *