विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वाचनालयासाठी पुस्तक व पुस्तके ठेवण्यासाठी रॅकची (मांडणी) भेट देण्यात आली. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्याकडे पुस्तकांचे संच सुपुर्द केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या अध्यक्षा देविका रेळे, प्रतिभा धूत, माजी अध्यक्षा आशाताई फिरोदिया, छायाताई फिरोदिया, साक्षरता संचालक दादासाहेब करंजुले, गीता गिल्डा, शशी झंवर, सचिव प्रभा खंडेवाल, जयश्री कार्ले, माधव देशमुख, शालेय शिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे आदी उपस्थित होते.
जयश्री कार्ले म्हणाल्या की, मनुष्याला सुसंस्कृत बनविण्याकरीता पुस्तके भावी पिढीत विचार रुजवतात. पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास साधला जातो. त्यामुळे लहान वयातच बालकांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या उद्देशाने घेतलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादासाहेब करंजुले म्हणाले की, ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा पुस्तकरुपाने टिकवता येतो. ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व आजही टिकून आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कारी बनविण्यासाठी वाचनाकडे वळविण्याची गरज असून, त्या उद्देशाने रोटरी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिता काळे म्हणाल्या की, लहान मुले मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. मोबाईलमध्ये अनेक ॲप व गेम उपलब्ध झाल्याने नवीन पिढीने पुस्तकांकडे पाठ फिरवली आहे. महान व्यक्तींचे आदर्श मुलांमध्ये रुजविण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरीने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या वाचनालयास पुस्तकांची भेट दिल्याबद्दल शालेय शिक्षिका सुरेखा वाघ व शितल आवारे यांनी आभार मानले.
