डिजीटल मार्केटिंगच्या कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींना इंग्रजी संभाषणाचे धडे देण्यासह डिजिटल मार्केटिंग मध्ये नावलौकिक प्राप्त करणारे जावेद शेख यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बंधन लॉनमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अभिनेते राजेश नन्नवरे, साहित्यिक संजय कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, ॲड. धनंजय जाधव, सुप्रिया जाधव, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उद्योजक राजेश भंडारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष हरीश नय्यर, सेक्रेटरी कुनाल कोल्हे आदी उपस्थित होते.
जावेद शेख मागील दहा वर्षापासून प्रॉमिनंटच्या माध्यमातून युवक-युवतींना इंग्रजी संभाषणाचे धडे देत आहे. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अहमदनगर व पुणे येथे त्यांचे कार्य सुरु असून, अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करुन दिल्या आहेत. अहमदनगर ट्रेंड्सच्या माध्यमातून देखील डिजीटल मार्केटिंग करत असून, त्याचे 77 हजार फॉलोअर्स आहेत. शहरात 2019 मध्ये डिजिटल मार्केटिंगचा पायंडा त्यांनी पाडला. व सध्या ते पुणे व नगर मध्ये जाहिरात क्षेत्रात उत्कृष्ठ काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.