विटभट्टी मजुराच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
समाज कल्याण विभागातर्फे अर्थसहाय्य व पोलीस संरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय समाजातील विटभट्टी मजूर कामावर असताना पिडीत मुलगी घराच्या पाठीमागे गेली असताना दोन नराधमांनी तिला उचलून नेऊन लैंगिक अत्याचार केला व तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या पिडीत कुटुंबीयांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तर या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी व पिडीत कुटुंबाला समाज कल्याण विभागातर्फे अर्थसहाय्य व पोलीस संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका आरोपीस अटक केली आहे. दहशत केल्यामुळे मुलीने दुसऱ्या आरोपीचे नाव सांगितले नव्हते, पुरवणी जबाबामध्ये दुसऱ्या आरोपीचे नाव सांगितले आहे. त्या आरोपीला देखील अटक होण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.
पिडीत कुटुंबीयांनी फोन करुन रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना हा प्रकार सांगितला असता, तातडीने रिपाईच्या शिष्टमंडळाने कुटुंबाला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची व कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.
रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना संपर्क करुन सदर घटना सांगितली असता, त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष पिडीत कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. कुटुंबाने घाबरुन न जाता, त्यांना पोलीस संरक्षण व समाज कल्याण विभागामार्फत अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, जिल्हा नेते रविंद्र दामोदरे, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव साळवे, सतिश साळवे, राजेंद्र गायकवाड, पप्पू शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.