7 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणारा आत्मक्लेश
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत बैठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी व पेन्शन वाढसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनात होणार असून, यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे देयके महामंडळाकडे थकलेले असून, त्यांना सर्व देयके तात्काळ अदा करावे, शासनस्तरावर ईपीएस 95 बाबत योग्य तो निर्णय घेऊन पेन्शन वाढपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा, कामगार करारात मंजूर झालेल्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती महामंडळाने करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी मोफत पास मिळावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे एकरकमी देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्ती कर्मचारी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी दिली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.25 सप्टेंबर) महामंडळाच्या नोटीसनुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबई येथे उपमहाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करणार आहे. वेतन वाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे अद्याप देण्यात आलेले नसून, हा भार अंदाजे तीनशे कोटी रुपयांचा असल्याचे बलभीम कुबडे यांनी सांगितले आहे.
नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच 2020 पासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. यादरम्यान निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढलेली वेतनश्रेणी, महागाई भत्ता आणि घरभाडे अशी जी काही फरकची रक्कम होईल ती एकरकमी मिळावी अशी ही सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी आहे. केंद्र सरकारची तटपुंजी पेन्शन सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेली अल्प अशी रक्कम यात खर्च भागवतांना निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. महागाईच्या काळात त्यांना जीवन जगणे अवघड झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.